मुकुंदवाडीत उद्यापासून पुन्हा बुलडोझरची धास्ती, दीडशेहून अधिक अतिक्रमणे पाडणार
मुकुंदवाडीत उद्यापासून पुन्हा बुलडोझरची धास्ती, दीडशेहून अधिक अतिक्रमणे पाडणार बातमीची लिंक कमेंटमध्ये
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) :
मुकुंदवाडीत खुनाच्या घटनेनंतर पोलीस, महापालिकेने अतिक्रमणांवर शुक्रवारी (२० जून) सर्जिकल स्टाइक केला. २२९ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. दुपारी साडेबाराला सुरू झालेली कारवाई सायंकाळी साडेसातला थांबली. अतिक्रमणधारकांना २ दिवसांचा वेळ दिला. सोमवारपासून (२३) पुन्हा बुलडोझरची तोंडे अतिक्रमणांकडे वळणार असून, दीडशेहून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. अतिक्रमण धारकांनी कारवाईला विरोध केला, मात्र शुक्रवारी झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि व्यावसायिक स्वतःहून अतिक्रमणे काढून घेत आहेत.
सोमवारी सकाळपासून कारवाईला सुरुवात होईल.
अतिक्रमणे काढल्यानंतर लगेचच सर्व्हिस रोडचे काम सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. बीड बायपासवर मार्किंग करून खांब रोवले आहेत. त्याचप्रमाणे मुकुंदवाडीतील जालना रोडवरही खांब लावण्यात येतील. शनिवारी या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मार्किंगही केले. अतिक्रमणे निर्मूलन मोहिमेत जमीनदोस्त केलेले सामान अतिक्रमणधारक बाहेर काढताना दिसत आहे. लोखंडी अँगल जमा करून भंगारमध्ये विकण्यासाठी धडपड दिसून आली. दरम्यान, ज्यांच्याकडे महापालिकेची बांधकाम परवानगी किंवा सर्व कागदपत्रे आहेत अशांना महापालिकेकडून टीडीआर (ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राइट) देण्यात येणार आहे. नागरिकांनी मनपामध्ये सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अतिक्रमणधारकांची निदर्शने...
अतिक्रमण जमीनदोस्त केल्यामुळे संतप्त नागरिकांनी शनिवारी (२१ जून) मुकुंदवाडीत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रस्त्यावर येऊच दिले नाही. भाजपच्या तीन आमदारांवर आरोप करत, प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत अतिक्रमणधारकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. खुनाच्या आरोपीला सगळ्यांसमोर फाशी द्या, पण आमचे घर, दुकान पाडू नका, अशी मागणी अतिक्रमणधारकांनी केली. पोलिसांच्या आशीर्वादानेच अवैध धंदे आणि गुन्हेगारी
सगळ्यांसमोर फाशी द्या, पण आमचे घर, दुकान पाडू नका, अशी मागणी अतिक्रमणधारकांनी केली. पोलिसांच्या आशीर्वादानेच अवैध धंदे आणि गुन्हेगारी वाढल्याचा आरोप अतिक्रमण धारकांनी केला. रस्ता मोठा करायचा तर आधी धनदांडग्यांच्या जागा रिकाम्या करा, अशी मागणी अतिक्रमणधारकांनी केली. आंदोलनात भाऊसाहेब जगताप, बाबासाहेब डांगे, कमलाकर जगताप, हारुण कुरेशी यांच्यासह अतिक्रमणधारक सहभागी झाले होते.
बेकायदेशीर व्यवसायाच्या आडून निष्पाप तरुणाची हत्या झाली. यापूर्वीही त्यांच्याकडून गुन्हे झाले होते. रात्रीतून महापालिका आयुक्तांशी चर्चा करून दोन्ही विभागांनी मिळून अतिक्रमणांविरोधात कारवाईचा निर्णय झाला. कुणी कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करत असेल तर तमा न बाळगता बळाचा वापर करून कठोर कारवाई करू. पोलीस कुणाच्याही दबावाखाली येणार नाहीत. बेकायदेशीर बांधकामे पाडताना कायदेशीर पडताळणी केली होती. -प्रवीण पवार, शहर पोलीस आयुक्त
मुकुंदवाडीतील कारवाई पूर्ण झाल्यानंतर पडेगाव, पैठण रोडवर कारवाई करण्यात येईल. सर्व्हिस रोडसाठी ६० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. राजकीय मंडळींनी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला पाठिंबाच दिला आहे. रस्ते रूंद असावेत, ही सर्वांचीच इच्छा आहे. यापूर्वीही राजकीय मंडळींनी आग्रह धरला होता, मात्र महापालिका कमी पडली होती.
-जी. श्रीकांत, महापालिका आयुक्त
What's Your Reaction?






