मन्नू दाजीच्या दारू अड्ड्यावर राडा; बंदूक ताणली!; सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थरार

 0
मन्नू दाजीच्या दारू अड्ड्यावर राडा; बंदूक ताणली!; सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थरार

 मन्नू दाजीच्या दारू अड्ड्यावर राडा; बंदूक ताणली!; सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थरार

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) :

गौतमनगर आंबेडकरनगर गल्ली नं. १५ येथे मन्नू दाजी याच्या दारूच्या अड्ड्यावर राडा झाला. पत्त्याच्या डावात जिंकलेल्या युवकाला ५ जणांनी घेरून बेदम मारहाण केली. त्यानंतर एकाने युवकावर बंदूक ताणत गोळ्या घालण्याची धमकी दिली. गंभीर जखमी होऊन रक्तस्त्राव होऊन युवक बराच वेळ तसाच पडून होता. अखेर त्याला शोधत आलेल्या त्याच्या मित्राने त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. सिडको पोलिसांनी ५ हल्लेखोरांविरुद्ध शनिवारी (२१ जून) दुपारी गुन्हा दाखल केला आहे.

राहुल सुरेश हिवराळे (वय ३०, रा. एन ८ सिडको साखरे मंगल कार्यालयजवळ नवभारत हौसिंग सोसायटी) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो आई व भावासह राहतो. वाळूज एमआयडीसीतील CO-2 कंपनीत वेल्डर आहे. बुधवारी (१८ जून) रात्री साडेअकराच्या सुमारास तो गौतमनगर आंबेडकरनगर गल्ली नं. १५ येथे मन्नू दाजी याच्या दारूच्या अड्ड्यावर दारू पिण्यासाठी गेला. दारू पिऊन मन्नू दाजीच्या घरात पत्त्याचा डाव चालू असल्याने तोही पत्ते खेळू लागला. पत्त्यात दहा ते अकरा हजार रुपये तो जिंकला. पैसे जिंकून घरी जाण्यासाठी निघाला असता पैसे जिंकण्याच्या कारणावरून त्याला टिक्या, अजय, मुन्ना, मन्नू दाजी, दाद्या सर्वांचे पूर्ण नाव माहीत नाही यांनी थोड्याच अंतरावर राहुलला रस्त्यात अडवले.

चल. पैसे जिंकून जाऊ शकत नाही. त्यावर राहुल म्हणाला, की मला आता पत्ते खेळायचे नाही. घरी जायचे आहे. त्यावेळी सर्वांनी राहुलसोबत वाद घालून शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण केली. त्यांच्यापैकी टिक्याने त्याच्या हातातील लाकडी दांडा राहुलला जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. तो चुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो डाव्या डोळ्यांच्या भुवईच्या वर कपाळावर गंभीर मार लागला. तरीही टिक्याने त्याच्या हातातील दांड्याने छातीवर, पोटावर जोर जोरात मारून राहुलला जखमी केले. त्यानंतर टिक्याने पिस्तूलसारख्या वस्तूने राहुलला धाक दाखवून तुला गोळ्या घालीन.. अशी धमकी दिली. सोबतचे अजय, मुन्ना, मन्नू दाजी, दाद्या यांनीदेखील त्याठिकाणी पडलेल्या लाकडी दांड्याने राहुलला जोरजोरात मारहाण केली. खिशातील पत्त्यात जिंकलेले अकरा हजार रुपये बळजबरीने टिक्याने काढून घेतले. त्या ठिकाणावरून सर्व निघून गेले. डोक्याला मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने त्याच ठिकाणी पडून होता. त्यावेळी ओळखीचा असलेल्या अविनाश कांबळे याने राहुलला घाटी रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नानेकर करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow