मधुमेह आणि गर्भावस्था - राष्ट्रीय परिषदेत होणार मंथन

 0
मधुमेह आणि गर्भावस्था  - राष्ट्रीय परिषदेत होणार मंथन

मधुमेह आणि गर्भावस्था

- राष्ट्रीय परिषदेत होणार मंथन 

छ. संभाजीनगर –  दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क 

गर्भधारणेपूर्वी मधुमेह असल्यास किंवा गर्भधारणे नंतर मधुमेह झाल्यास त्याचे आधुनिक उपचाराच्या मदतीने नियोजन करता येते, सुरक्षित प्रसूती होऊन आई आणि बाळ दोघेही निरोगी आयुष्य जगू शकतात. हे ज्ञान जनसामान्यांपर्यंत पोचावे यासाठी औरंगाबाद मधुमेह तज्ञ संघटनेच्या वतीने प्रेग्नसी स्टडी ग्रुप फॉर डायबेटीस २०२४ (पीसीजी)या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संघटनेतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

दि. ३० नोव्हेबर आणि १ डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत देशभरातून चारशेच्यावर प्रतिनिधी सहभागी होणार आहेत तर देश आणि विदेशातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मधुमेह असलेल्या महिलेला गर्भधारणेत अडचणी येतात. गर्भधारणा झाल्यानंतर ही काही आठवड्यानंतर मधुमेह होऊ शकतो. दोन्ही स्थितीत आई आणि बाळ दोघानांही धोका असतो. अशी गर्भधारणा आव्हानात्मक असली तरी आधुनिक वैद्यकीय ज्ञान आणि तंत्र यांच्या मध्यमातून सुरक्षित मातृत्व मिळवता येते. 

मधुमेह आणि गर्भधारणा यासंदर्भात या परिषदेत मंथन होणार आहे. गर्भधारणेपूर्वी रक्तातील वाढीव साखरेचे नियोजन आहे, लठ्ठपणा आणि गर्भधारणा, गर्भधारणेदरम्यान रक्तातील उच्च साखरेची तपासणी, वैद्यकीय मार्गदर्शक तत्वे आणि उपचारपद्धती, इन्सुलिन आणि औषधोपचार, तंत्रज्ञान आणि आर्टिफिशिअल इंटलीजन्स, आहाराचे योग्य नियोजन, गर्भातील बाळाच्या वाढीचे निरीक्षण इत्यादी विषयांवर परिषदेत तज्ञांचे मार्गदर्शन आणि कार्यशाळा होणार आहे. 

पुणे येथील ज्येष्ठ तज्ञ डॉ. चित्तरंजन याज्ञिक, केरळ येथील डॉ. ज्योतीदेव केसवदेव, तामिळनाडू हून डॉ भावतारिणी ,अहमदाबाद येथील डॉ. बन्सी साबू, ऋतुल गोकलानी , दिल्ली येथील डॉ. शालिनी जग्गी, डॉ राजीव चावला, मुंबई येथील डॉ. पूर्णिमा सातोसकर, उदय ठाणवाला, डॉ. रोहन डिसुझा , डॉ मयुरा काळे इत्यादी तज्ञांचे मार्गदर्शन दोन दिवसांच्या या परिषदेत होणार आहे. 

छ. संभाजीनगर मधील ज्येष्ठ मधुमेह तज्ञ डॉ. संजीव इंदुरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि पल्लवी याज्ञिक यांच्या सहकार्याने शहरातील विविध रुग्णालयातील पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांसाठी खास कार्यशाळा दि. ३० नोव्हेबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. यात ग्लुकोमीटर आणि इन्सुलिन सिरींजचा वापर, रुग्णाचा आहार अशा विविध विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पिएसजी २०२४ या परिषदेत मधुमेह आणि गर्भधारणा विषयावर सर्वांगाने उहापोह होणार आहे याचा फायदा डॉक्टरांच्या मदतीने तळागाळातील रुग्णांना करून देणे असल्याचे डॉ मयुरा काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. परिषद यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. संजीव इंदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सचिव डॉ. मयुरा काळे, उपाध्यक्ष डॉ. अजय रोटे, डॉ. दिपक भोसले, डॉ. अहसान शेख, डॉ. ऋतूल गोकलानी, डॉ. धर्मेंद्र पांचाल, डॉ. दिपक चुडासमा प्रयत्न करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow